• 29 March 2024 (Friday)
  • |
  • |

२०२४ मध्ये भाजपला हरवणे हेच अंतिम लक्ष - सोनिया गांधी


नवी दिल्ली : पुढील लोकसभा निवडणूक हेच भाजपविरोधी राजकीय पक्षांचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे. ते गाठण्यासाठी आणि देशहितासाठी विरोधी पक्षांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केले. आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा लागेल, असे नमूद करीत, सोनिया यांनी, ‘‘भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल, आता त्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही,’’ असे स्पष्ट केले. सोनिया गांधी यांनी दूरसंवाद माध्यमांद्वारे शुक्रवारी १९ विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. भाजपविरोधात एकत्र येण्याची हीच वेळ असून काँग्रेस पक्ष मागे राहणार नाही, असे सोनिया म्हणाल्या. विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीत काँग्रेस सर्वांत कमकुवत पक्ष असल्याची टीका होत असल्याने विरोधकांच्या एकजुटीत तसेच भाजपविरोधातील लढाईमध्ये काँग्रेसच्या संपूर्ण सहभागाबाबत सोनियांनी भूमिका स्पष्ट केली. पेगॅसस, शेतकऱ्यांचे प्रश्न, इंधन दरवाढ, करोना संकट अशा अनेक समस्या भेडसावत असून त्या सोडवण्यात केंद्र सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांना केंद्र सरकारने प्रमुख विषयांवर बोलू दिले नव्हते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न केले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वच्या सर्व २० विरोधी पक्षांनी सभागृहांमध्ये एकजुटीने आणि समन्वयाने केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला होता. त्या अनुषंगाने सोनिया म्हणाल्या, ‘‘अशीच एकजूट आणि समन्वय संसदेबाहेरही कायम राहील, असा विश्वास वाटतो. सत्ताधाऱ्यांविरोधातील व्यापक लढाई (लोकसभा निवडणूक) संसदेबाहेर, लोकांमध्ये जाऊनच लढावी लागेल.’’ महाआघाडीच्या नेतृत्वाच्या वादग्रस्त मुद्द्याला विरोधकांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत बगल दिल्याचे दिसत आहे. वैयक्तिक हित दूर ठेवावे : ममता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात चळवळ उभारण्याबाबत निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षांची एक मुख्य समिती नियुक्त करण्यात यावी, अशी सूचना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. आपले वैयक्तिक हित बाजूला ठेवून आपण एकत्र येऊ या, असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीला मजबूत करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. महाआघाडीचे नेतृत्व कोण करेल हे महत्त्वाचे नाही, असे ममता म्हणाल्या. केंद्राकडून अडवणूक केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून राज्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन या चारही मुख्यमंत्र्यांनी करोना साह्य आणि लसीकरणात केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचेही पंतप्रधानांकडे स्पष्ट केले आहे. काँग्रेसनेही लोकांच्या हातात थेट पैसे देण्यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवले असल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. चारही मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते. लढाईचे प्राधान्यक्रम ठरवावेत : शरद पवार एकाच वेळी सर्व मुद्द्यांबाबत आघाडी उघडण्यापेक्षा प्राधान्यक्रम ठरवून एकेक मुद्दा हाती घेऊ न लढले पाहिजे आणि त्याचे निराकरण केले पाहिजे. त्याद्वारे लोकांना चांगले वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य देता येऊ शकेल, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. देशातील वास्तव परिस्थिती उद्विग्न करणारी असून केंद्र सरकार लोकांच्या सर्व समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. लोकशाही विचारांवर आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्या दृष्टीने ही बैठक गरजेची होती, असे पवार म्हणाले. आप, बसप नकोसे, ‘सपा’ची अनुपस्थिती या बैठकीला बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आणि अकाली शिरोमणी दलाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. समाजवादी पक्षाला निमंत्रण होते, मात्र या पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव बैठकीत सहभागी झाले नाही. दुर्गम भागात दौरा करत असल्याने बैठकीत सहभागी होऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. उत्तर प्रदेशमध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून समाजवादी पक्षाने काँग्रेसशी युती न करता छोट्या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अ‍ॅण्टनी आणि संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल बैठकीत सहभागी झाले होते. नॅशनल कॉन्फरसचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह भाकप, जनता दल (धर्मनिरपेक्ष), राष्ट्रीय लोकतांत्रिक दल, आरएसपी, केरळ काँग्रेस (मणी), एआययूडीएफ, व्हीसीके, आययूएमएल अशा १९ पक्षांचे नेते दूरचित्रवाणी संवादाद्वारे झालेल्या बैठकीत उपस्थित होते. विरोधकांचे संयुक्त निवेदन केंद्र सरकारच्या समस्या हाताळणीतील अपयशावर टीका करणारे आणि ११ मागण्यांचे संयुक्त निवेदन विरोधकांकडून प्रसिद्ध करण्यात आले. लसीकरणाचा वेग वाढवावा व सर्वांचे मोफत लसीकरण करावे, पेट्रोल व डिझेल, घरगुती गॅस आदींच्या किमती कमी कराव्यात, नवे कृषी कायदे मागे घ्यावेत आणि किमान आधारभूत किमतीची हमी द्यावी, कामगार कायदे शिथिल करण्याची प्रक्रिया मागे घ्यावी, रोजगार हमी योजनेत २०० दिवसांची हमी द्यावी, पेगॅससची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी सुरू करावी, भीमा कोरेगाव व इतर प्रकरणांतील राजकीय कैद्यांना मुक्त करावे, जम्मू-काश्मीरमधील राजकीय कैद्यांनाही मुक्त करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी २० ते ३० सप्टेंबर दरम्यान विरोधक एकत्रितपणे देशभर आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारविरोधात अनेक मुद्द्यांवर लढावे लागणार आहे. त्यासाठी सामूहिक कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे.आहे. त्यासाठी सामूहिक कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल, आता त्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. – सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष महाआघाडीचे नेतृत्व कोण करेल हे महत्त्वाचे नाही. त्यामुळे नेतृत्व कोणाकडे असावे हे विसरून आणि आपले वैयक्तिक हित बाजूला ठेवून आपण एकत्र येऊया. – ममता बॅनर्जी, प्रमुख, तृणमूल काँग्रेस


महत्वाच्या बातम्या



हवामान