• 15 August 2022 (Monday)
  • |
  • |


सांगली जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बुधवार दि. १४ पासून १९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थास तसेच मॉर्निंग वॉकसाठी बंदी घालण्यात आली आहे. तर किराणा दुकानांना...सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बुधवार दि. १४ पासून १९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थास तसेच मॉर्निंग वॉकसाठी बंदी घालण्यात आली आहे. तर किराणा दुकानांना घरपोच सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले, जुलैमधील दुसर्‍या आठवड्याचा साप्‍ताहिक पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० च्या दरम्यान आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध दि. १९ पर्यंत वाढविण्यात आले होते. परंतु, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत असल्याने या निर्बंधामध्ये आणखी वाढ करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ते लागू करण्यात येत आहेत. ते म्हणााले, रस्त्यावरील कोणत्याही प्रकारचे साहित्य आणि खाद्यपदार्थ विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. तसेच खुली मैदाने, मॉर्निंग वॉक, सायकलिंग यासाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकृत भाजीमंडईला मात्र सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. शहरातील व ग्रामीण भागातील आठवडा बाजार मात्र बंद राहणार आहेत. भाजी व फळ विक्रेते यांनी शक्यतोवर घरपोच सेवा द्यावी. तसेच अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ असणार्‍या आस्थापनेकडून घरपोच सेवा देण्याची सोय करावी.लग्न समारंभावर देखील निर्बंध लादण्यात येत आहेत. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ जणांना परवानगी देण्यात आली असून लग्नासाठी केवळ २ तासाची मुदत देण्यात आली आहे. निर्बंधांचा भंग करणार्‍या कुटुंबास ५० हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच संबंधित मंगल कार्यालय देखील सील करण्यात येणार आहे. मंगल कार्यालय मालकांनी त्यांच्या कार्यालयात होणार्‍या समारंभाची स्थानिक प्रशासन व पोलिसांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानातील मालक, कर्मचारी विनामास्क आढळून आल्यास त्यांच्यावर पाचशे रुपये दंड करावा. विनामास्क ग्राहकांना साहित्य विक्री केल्यास १ हजार रुपये तर दुकान मालकाकडून निर्बंधांचे वारंवार उल्लंघन झाल्यास दुकान सील करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले, किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी,मिठाई, खाद्य पदार्थाची दुकाने इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांची आहे. त्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. सदर आस्थापना यांनी घरपोच सेवा देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य ते नियोजन करावे. या आदेशाचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे देखील जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी म्हटले आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान