शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आज

कृषी क्षेत्रातील अस्थैर्य कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे (कॅबिनेट) आज, सोमवारी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे। सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर होणार असल्यामुळे...कृषी क्षेत्रातील अस्थैर्य कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे (कॅबिनेट) आज, सोमवारी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे। सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर होणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेटची बैठक सोमवारी होत असून त्यामध्ये कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाचा विचार केला जाणार आहे। उत्पन्नातील तुटीमुळे छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना येणारे नैराश्य याविषयी प्राधान्याने बैठकीत विचार होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ करण्याचे उपाय तसेच दीर्घकालीन उपाय याविषयी अनेक पर्याय कृषी मंत्रालयाने आपल्या प्रस्तावात सुचवले आहेत। या उपायांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्यामुळे यावर कॅबिनेटने शिक्कामोर्तब केल्यावरच त्याबाबत विचार होणार आहे। या उपायांमध्ये कृषिकर्जाची वेळेवर फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या कर्जावरील व्याज माफ करावे, हा प्रस्ताव आहे। मात्र, असे केल्यास सरकारी तिजोरीवर त्याचा सुमारे १५ हजार कोटी रुपये भार पडणार आहे। पिकांची विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्या विम्याचा हप्ता पूर्णपणे माफ करावा, असाही प्रस्ताव यामध्ये देण्यात आला आहे। तेलंगण व ओडिशा येथील सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा करतात। या योजनेचाही विचार कॅबिनेट बैठकीत केला जाणार आहे। केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी, म्हणजेच १ फेब्रुवारीपूर्वी शेतकऱ्यांसाठी सरकार विशेष पॅकेजची घोषणा केली जाईल, असे सूतोवाच अलिकडेच केले होते। अशा प्रकारे एखादे पॅकेज जाहीर केले तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हातात वेळ फारच थोडा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। निवडणुकीच्या काळात या पॅकेजचा राजकीय लाभ उठवायचा असेल तर जलद अंमलबजावणी करता येईल, असे पॅकेज देण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे।

हवामान