• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


देशात ऑगस्टमध्ये येणार तिसरी लाट - आयआयटी हैद्राबाद


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कोरोनाची तिसरी लाट या महिन्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. असे आयआयटी हैदराबाद आणि कानपूरच्या तज्ज्ञांनी गणिती आकडेवारीच्या माध्यमातून ही सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र आणि केरळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील रुग्णसंख्येवरच कोरोना रुग्णांची संख्या किती वाढेल हे स्पष्ट होणार असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही भविष्यवाणी गणिताच्या मॉडलनुसार करण्यात आली आहे. आयआयटी हैदराबाद आणि कानपूरचे तज्ज्ञ मधुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांनी ही भविष्यवाणी केली आहे. या तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशात गेल्या २४ तासात १७,०६,५९८ लोकांना कोरोनाची व्हॅक्सीन टोचण्यात आली आहे. आतापर्यंत ४७,२२,२३,६३९ लोकांना व्हॅक्सिन टोचण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी घातक नसेल. मात्र, तरीही सावधानता बाळगावी लागणार आहे. तिसऱ्या लाटेत रोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण सापडू शकतात. परिस्थिती बिघडली तर हा आकडा दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, ७ मे नंतर ही संख्या हळूहळू कमी झाली. महाराष्ट्र आणि केरळासह ज्यादा रुग्णसंख्या वाढणाऱ्या राज्यांवर कोरोनाचे रुग्ण किती वाढणार हे अवलंबून असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी १६ लाख ९५ हजार ९५८ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ८ लाख ५७ हजार ४६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख २४ हजार ७७३ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ४ लाख १३ हजार ७१८ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ४७ कोटी २२ लाख २३ हजार ६३८ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हवामान