• 29 March 2024 (Friday)
  • |
  • |


जिल्ह्याच्या क्रीडा प्रगतीसाठी पत्रकारसंघ बांधील........ माधवराव अंभोरे यांचे प्रतिपादन ; गुणवंत खेळाडूंचा निशांत पतसंस्थेत सत्कार

वाशीम दि.२५:(जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये मोठी प्रतिभा आहे. या खेळाडूंना पुढे जाण्यास बराच वाव आहे. मात्र क्रीडा क्षेत्रातील मागासलेपणामुळे ते मागे राहतात. क्रीडाक्षेत्रात जिल्ह्याची प्रगती व्हावी, यासाठी जिल्हा...



वाशीम दि.२५:(जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये मोठी प्रतिभा आहे. या खेळाडूंना पुढे जाण्यास बराच वाव आहे. मात्र क्रीडा क्षेत्रातील मागासलेपणामुळे ते मागे राहतात. क्रीडाक्षेत्रात जिल्ह्याची प्रगती व्हावी, यासाठी जिल्हा पत्रकार संघ बांधील आहे, असे मत पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी आज (दि.25) मांडले. निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी आणि जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने निशांत सभागृहात आयोजित गुणवंत खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अहमदाबाद(गुजरात) येथे झालेल्या प्री-नॅशनल रायफल शुटींग स्पर्धेत प्रावीण्य मिळविणार्‍या खेळाडूंचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निशांत पतसंस्थेचे विभागीय व्यवस्थापक सुरेश शिंदे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. रायफल शुटींग या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविणारे ऋषभ अजय ढवळे, क्षितीज राऊत, अरहंत घुगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या खेळाडूंची आता राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. त्याबद्दल पत्रकार संघाने खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. यासोबतच पिस्टल या क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त करणार्‍या सोनल चव्हाण, मृणाली आकरे, जान्हवी मानतकर या खेळाडू मुलींचाही कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या सर्व खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक प्रल्हाद आळणे यांचाही पत्रकार संघाने गौरव केला. या खेळाडूंचे कौतुक करून, पुढे बोलतांना श्री अंभोरे म्हणाले, क्रीडाक्षेत्रात जिल्ह्याचा लौकीक व्हावा म्हणून नवतरूण खेळाडूंनी अधिक परिश्रम घ्यावे. खेळाडूंच्या सर्वतोपरी मदतीसाठी पत्रकार संघ सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. निर्माणाधिन पत्रकार भवनात पत्रकारिता अभ्यासक्रम, भाषण-संभाषण कार्यशाळा आणि इतर उपक्रमांचे नियोजन आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार रवी कुटे यांनी वाशीम जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्रातील मागासपणासाठी कारणीभुत असलेल्या घटकांची अभ्यासपूर्ण मांडणी आपल्या मनोगतातून केली. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी.के. चव्हाण तसेच पत्रकार गणेश भालेराव यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. निशांत पतसंस्थेचे विभागीय व्यवस्थापक सुरेश शिंदे यानी आपल्या प्रास्ताविकातून पतसंस्थेची विस्तृत माहिती देवून सामाजिक उपक्रमात निशांत पतसंस्था अग्रेसर असल्याचे सांगीतले. प्रा. गजानन वाघ यांनी सुत्रसंचालन केले. दत्ता महाले यांनी आभार मानले. कार्यक्रमात निशांत पतसंस्थेच्या स्थानिक शाखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्यामराव उंडाळ, देविदास राऊत, रमन वनजाणी, भगवान शिंदे, सुभाषराव शिंदे, प्रशांतराव ठाकरे तसेच पत्रकार संघाचे नंदकिशोर शिंदे, सुनील मिसर, सुनिल कांबळे,गणेश भालेराव, गजानन भोयर, विठ्ठल देशमुख, रमेश उंडाळ, अजय ढवळे, प्रा. राम धनगर, संदीप डोंगरे, साजन धाबे, मदन देशमुख, गोपाल व्यास, नाजीर शेख, रामेश्वर बोडखे, अनिल वाघमारे, विजय चव्हाण, आदित्य बोडखे, श्याम गावंडे, शेखर कदम आदि उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्या



हवामान