• 29 March 2024 (Friday)
  • |
  • |


महत्वाच्या बातम्या



दुष्काळ अनुदानाचा घोळ!


दुष्काळातील अनुदान वाटपात औरंगाबाद व परभणी जिल्हय़ात मोठे घोळ झाले आहेत. औरंगाबाद\ जमीन नसताना अनुदान, तर काहींना दुपटीने दुष्काळाची मदत दुष्काळातील अनुदान वाटपात औरंगाबाद व परभणी जिल्हय़ात मोठे घोळ झाले आहेत. ज्यांच्या नावावर जमीनच नाही, अशांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच काही जणांना दोनदा अनुदान देण्यात आले आहे. निधीचा हा घोटाळा ३८ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीतून झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याची चौकशी महसूल उपायुक्त व परभणीच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून यात बरेच घोळ असल्याचे अधिकारीही मान्य करतात. फुलंब्री, परभणी, गंगाखेड, जिंतूर, पैठण या ठिकाणी हा घोळ झाला असून औरंगाबाद जिल्हय़ातील शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी दिलेल्या १९ कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांच्या अनुदानात एकच क्षेत्र दोनदा दाखवून अनेकांना दोनदा अनुदान दिले आहे. ही रक्कम २५ लाख ४८ हजार रुपयांची असल्याचा ठपका लेखाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केला आहे. हे सगळे घोटाळे किशोर देशमुख या तहसीलदारांच्या काळात असल्याचे दिसून आले आहे. कोटय़वधींचा हा घोळ मोठा चमत्कारिक असल्याचे अधिकारी सांगतात. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अहवालही आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहेत. एकाच खात्यावर रक्कम औरंगाबादच्या लेखाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात २०१४-१५ मधील लाभार्थ्यांची यादी बँक खाते न टाकताच बँकेकडे दिली. बँकेचे खाते, आयएफएससी कोड, बँकेचे नाव अशी कोणतीही माहिती न कळविताच १४ धनादेश देण्यात आले. याची रक्कम ५४ हजार ५०५ एवढी तपासणीमध्ये निघाली. एकाच बँक खात्यावर एकापेक्षा अधिक शेतकऱ्यांची रक्कम टाकण्याचा प्रकारही करण्यात आला. तसेच ४९ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष धारण जिरायत क्षेत्रानुसार देय अनुदानापेक्षा ९१ हजार ५३० रुपये अधिक दिले गेले. समान नाव असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वेगवेगळय़ा गावात दाखविण्यात आली. ४६० समान नावाच्या लाभार्थ्यांना वेगवेगळे क्षेत्र दाखवून अनुदान देण्याचा प्रतापही अधिकाऱ्यांनी केला. काही शेतकरी नगर जिल्हय़ातील राहता तालुक्यातील आहेत. त्यांना औरंगाबाद जिल्हय़ातून अनुदान देण्यात आले. सातबाऱ्यावर ज्या पिकांची नोंद नाही, अशा पिकांसाठी अनुदान देण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील २९ सज्जांपैकी केवळ सज्जांच्या तपासणीमध्ये हे घोळ औरंगाबादच्या लेखाधिकाऱ्यांनी काढले आहेत. राजेंद्र सूर्यभान जाधव या जातवा येथील शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर फळपिकांची नोंद नव्हती. तरी त्यांना ४ हजार ८०० रुपयांचा लाभ देण्यात आला. अशी सुमारे २ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली. वेगवेगळय़ा शेतकऱ्यांचे अनुदान त्यांचे नावे जमा न करता एकाच खात्यात टाकण्याचीही कमाल करण्यात आली होती. अशा शेतकऱ्यांची संख्या १९४ एवढी आहे. अनुदानाचे असेच घोळच घोळ घालत अधिकाऱ्यांनी कोटय़वधींची माया जमवली. केवळ फुलंब्रीमध्ये असे घडले नाही, तर परभणी जिल्हय़ातील जिंतूर, गंगाखेड, औरंगाबाद जिल्हय़ांतील पैठणमध्येही असाच प्रकार घडला. ही सगळी रक्कम वसूल करण्याची शिफारसही आता करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने चौकशी पूर्ण केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र अद्याप कारवाई काही झालेली नाही. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब सर्जेराव पाटील यांनी या अनुषंगाने तक्रार केली होती.

हवामान