• 29 March 2024 (Friday)
  • |
  • |


महत्वाच्या बातम्या



काळ्या पैसेवाल्यांचे तोंड काळे


हदगाव\ भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढला. या मोहिमेत काळे पैसेवाल्यांचे तोंड काळे झाले, अशा शब्दात नोटबंदीवरील टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी दिवसभरात पाच सभा घेतल्या. कुंडलवाडी येथे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०१९ पर्यंत देशात कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे देण्याचा संकल्प भाजपा सरकारचा आहे. कुंडलवाडीतील गरिब लोकांचेही प्रस्ताव पाठवा, त्यांना आम्ही निधी उपलब्ध करुन देवू. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत राज्यातील ३०० पैकी १५० शहरे हागणदारी मुक्त झाली आहेत. येणाऱ्या काळात गुणवत्ता, पारदर्शकता, गतीशिलता या धर्तीवर प्रशासन चालविले जाईल. उज्वल गॅस योजनेअंतर्गत आता कुठल्याही गरिब माय-माऊलीला चूल फूंकण्याची वेळ येणार नाही. पाच कोटी कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. उर्वरित आठ कोटी लोकांच्या घरात गॅस सिलेंडर शेगडीसह कनेक्शन दिले जाणार आहे. मुद्रा योजनेतून तारण न ठेवता चहावाले, फेरीवाले, छोटे दुकानदार यांना दहा हजारापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना हातोहात कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेतून ५० टक्के फीस भरणा राज्य सरकार करणार आहे. नोटबंदीच्या निर्णयातून आतंकवादी, नक्षलवाद्यांना फटका बसला. पाकिस्तानने खोट्या चलनी नोटा बाजारात आणल्या होत्या. त्यांनाही दणका बसला. कर चुकवून उशी, गाद्या व पलंगाखाली पैसा साठवलेल्या व्यापारी वर्गाला एका रात्रीत धडा शिकविला. या योजनेतून जमा होणाऱ्या ११ लक्ष कोटीतून गरिबांच्या कल्याणाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. आर्थिक स्वातंत्र्याचे तुम्ही सेनानी बनणार आहात, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या सभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजपाला साथ द्या, विकासाची हमी देतो, असे आवाहन केले. मंचावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, प्रभारी मनोज पांगरकर, माजी आ. गंगाराम ठक्करवाड, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, संतुकराव हंबर्डे, राम पाटील रातोळीकर आदींची उपस्थिती होती

हवामान